Maharashtra

शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने चित्रपटातून काढून टाकल होत – मल्लिका शेरावत

By PCB Author

July 04, 2018

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – अभिनेत्री मल्लिका शेरावत म्हणजे बोल्ड भूमिका, दृश्य आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या चर्चा हे समीकरण ठरलेलेच. बॉलिवूड चित्रपटांमधील ‘बोल्ड सीन्स’चा उल्लेख करायचा झाल्यास मल्लिकाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर’ या चित्रपटानंतर मल्लिका हे नाव बॉलिवूडमध्ये चांगलंच प्रसिद्ध झाले. पण ‘बोल्ड’ अभिनेत्री म्हटले की त्यासोबतच लोकांना तुमच्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण करण्याची जणू संधीच मिळते, असे वक्तव्य तिने केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘माझ्याबद्दल लोकांनी बरीच मतं तयार केली. जर तुम्ही शॉर्ट स्कर्ट घालत असाल, ऑनस्क्रीन किस करत असाल तर नैतिकदृष्ट्या तुम्ही चुकीचे आहात असे सहज ठरवले जाते. पुरुष या गोष्टीचा फार फायदा घेतात आणि माझ्यासोबत असे घडले सुद्धा, असे देखिल तीने सांगितले.

ऑनस्क्रीन जर तू प्रणयदृश्य करू शकतेस तर ऑफस्क्रीन शरीरसंबंध का ठेवू शकत नाही असा प्रश्न विचारत मला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक खुलासाही तिने केला. या कारणामुळे बरेच चित्रपट गमावल्याचेही तिने सांगितले. ‘मी ‘कॉम्प्रमाइज’ करण्यासाठी या इंडस्ट्रीत आले नाही. मलासुद्धा स्वाभिमान आहे. रात्री- अपरात्री काही दिग्दर्शक फोन करून घरी बोलवायचे. माझ्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण केले जातील या भीतीने मी खुलेपणाने कधीच व्यक्त झाले नाही. अनेकदा अशा प्रकरणी मुलींवरच प्रश्न उपस्थित केले जातात. आपल्या समाजाची ही मानसिकताच आहे. माझ्या चित्रपट निवडीवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले. ‘मर्डर’ चित्रपटाच्यावेळी तर प्रसारमाध्यमे माझ्याविरोधातच होते. मी कुठून आले आणि काय संघर्ष केला हे तर बाजूलाच राहिले आणि लोक फक्त किसिंग सीनबद्दलच बोलू लागले,’ या शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.