Maharashtra

शरद पवार सत्तेचा पेच बाजूला सारून शेतकऱ्यांच्या बांधावर

By PCB Author

November 14, 2019

मुंबई, दि.१४ (पीसीबी)- राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असून महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर बैठकांचे सत्र सुरु आहे. मात्र, अशा व्यस्त कार्यक्रमातूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार हे विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी नागपूरमध्ये दाखल झाले असून पीडित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

नागपूर जिल्ह्यातील चारगाव, काटोल येथील नुकसाग्रस्त भागाची शरद पवार यांनी आज पाहणी केली आणि तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. आज आणि उद्या दोन दिवस पवारांचा हा दौरा असणार आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाणं शरद पवार यांच्यासमोर मांडलं. अवकाळी अतिवृष्टीमुळे उभ्या शेतातला कापूस खराब झाला असून तो कोणीच विकत घेणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर राज्यात सरकार स्थापन होऊ न शकल्याने कापूस गोळा करण्याचे केंद्रच अद्याप स्थापन झालेले नाहीत. त्यामुळे कापूस खराब होत असून हा खराब झालेला कापूस व्यापारी घेणार नाही, अशी अडचण शेतकऱ्यांनी शरद पवारांसमोर मांडली.