शरद पवार, राज ठाकरे एकत्र आले, तरी भाजपला फरक पडणार नाही – रावसाहेब दानवे

0
1053

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी करून निवडणूक लढवली, तरी भाजपवर  कोणताही फरक पडत नाही. भाजप नशिबावर अवलंबून निवडणुका लढवत नाही. भाजप हा संघटनेच्या बळावर निवडणूक लढवतो. कोणी कोणाही सोबत गेले, तरी भाजपला काहीही फरक पडणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.  

चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे आज (शुक्रवार) शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत दानवे बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, मावळचे आमदार बाळा भेगडे, शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, खासदार अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्यासह शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार आणि राज ठाकरे यांनी एकाच विमानातून गुरूवारी (दि.२५) प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. हे दोन्ही नेते एकाच विमानाने औरंगाबादहून मुंबईला  रवाना झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये आघाडी होण्याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले होते. याबाबत दानवे यांनी छेडले असता त्यांनी कोण कोणाबरोबर गेले तरी भाजपवर काहीही फरक पडत नाही, असे दानवे म्हणाले.