Desh

शरद पवार यांनी 1962 सालाच्या भारत-चीन युद्धाची आठवण का करून दिली

By PCB Author

June 28, 2020

सातारा, दि. २८ (पीसीबी) : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी “ही राजकारणाची वेळ नाही “, असं म्हणत काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे. शरद पवार साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी 1962 सालाच्या भारत-चीन युद्धाची आठवण करुन दिली. 1962 साली 45 हजार चौ.किमीचा भूभाग गेला. ते कसं विसरता येईल? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान, पवार यांनी दिलेल्या माहितीमुळे मोदी यांच्यावर तुटून पडणाऱ्या काँग्रेसचे अवसान गळाले आहे.

भारत-चीन सीमावाद सुरु असताना काँग्रेसकडून सातत्याने केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली जात आहे. भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. याशिवाय काल (26 जून) महाराष्ट्रात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भारत-चीन सीमावादावरुन केंद्र सरकारवर टीका केली. त्यानंतर आज शरद पवार यांनी ही राजकारणाची वेळ नाही म्हणत काँग्रेस नेत्यांना टोला लगावला.

“चीन कुरापत नक्कीच करत आहेत. आपण आपला रस्ता आपल्या हद्दीत करत आहोत. आपण आपल्या भागात जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. सियाचीन भागासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. 1993 साली मी संरक्षण मंत्री असताना चीनला गेलो होतो. त्यावेळी बॉर्डरवरील सैन्य कमी करण्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांनी करार केला”, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

“सीमा भागात गस्त घालताना काहीही होऊ शकतं. त्यामुळे लगेच संरक्षण मंत्र्यांचं अपयश आहे, असं म्हणू नये”, असंही पवारांनी म्हटलं. “चीनने यापूर्वीच 1962 साली भारतीय भूमीचा ताबा घेतला आहे. आज घेतला की नाही, हे माहीत नाही. मात्र, राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यात राजकारण आणू नये”, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.