Maharashtra

शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिस व्हॅनला अपघात

By PCB Author

June 29, 2020

लोणावळा, दि. २९ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीस पायलट व्हॅन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली आज सकाळी पलटली. यामध्ये एकाला किरकोळ मार लागल्याची माहिती मिळते आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आजचा दिवस हा अपघाती दिवस बनला आहे. सकाळी खोपोली शहर‍च्या हद्दीत ढेकू गावाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले होते. याठिकाणी झालेली अपघातांची कोंडी कमी होते न होते तोच खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमृत‍ांजन पुलाच्या खाली पोलीस व्हॅन पलटी झाली.

शरद पवार यांचा ताफा आज सकाळी मुंबईच्या दिशेने जात असताना ताफ्यात मागे असलेली पोलीस व्हॅन क्र. (एमएच 12 एनयु 5881) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यात पलटी झाली. महामार्गावरील देवदूत पथक व खंडाळा महामार्ग पोलिसांनी तात्काळ गाडीमधील चालक व किरकोळ मार लागलेल्या पोलीस कर्मचार्‍यावर प्राथमिक उपचार करत अपघातग्रस्त वाहन बाजूला केले आहे.