Maharashtra

शरद पवार यांच्या आत्मचरित्रात ही खोटी माहिती…

By PCB Author

October 14, 2020

अहमदनगर, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्रात असत्य माहिती सांगितल्याचा आरोप पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी केला आहे. बाळासाहेब विखे यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्रात यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्रात (पृष्ठ क्र.२०, २१) प्रवरा कारखान्याच्या उभारणीत अण्णासाहेब शिंदेंचा सहभाग असल्याचा उल्लेख आहे. मात्र ही माहिती असत्य असल्याचं बाळासाहेब विखे-पाटील यांनी लिहिलं आहे. माहितीचा स्त्रोत जर असत्यावर आधारित असेल तर तोच सत्य म्हणून पुढे पुढे येत राहतो. अशा असत्य माहितीची नोंद इतिहासात कधी कधी होते व तेच सत्य म्हणून स्वीकारलं जाण्याची शक्यता असते, असं बाळासाहेब विखे म्हणतात.

पुढे ते लिहितात, “वस्तुतः कारखान्याचा पहिला गळीत हंगाम १९५० साली सुरु झाला. अण्णासाहेब शिंदे १९५५ साली सभासद झाले, तर १९५७-५८ साली ते संचालक झाले. त्यानंतरच ते कारखान्यावर आले. मग त्यांचा कारखाना उभारणीत सहभाग कसा असेल? याचा अर्थ जाणीवपूर्वक असत्य माहिती पसरवून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय.”