शरद पवार यांचे पिंपरी चिंचवडशी नाते काय ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
623

महाराष्ट्राचा सुवर्णकलश ज्यांनी आणला ते देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे सच्चे वारसदार, राजकारणात ५५-६० वर्षे प्रदीर्घ प्रवास केलेले दूरदृष्टीचे जाणकार, जाणता राजा अशी ज्यांची ख्याती आहे ते देशातील एक सर्वमान्य लोकनेते, शेतकरी व कष्टकरी यांचे कैवारी शरद पवार यांचा आज वाढदिवस. बारामती म्हणजे शरद पवार तसेच पिंपरी चिंचवड आणि पवार यासुध्दा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या शहरासाठी त्यांचे किती मोठे योगदान आहे त्याचा हा संक्षिप्त गोषवारा….
———————-
शरद पवार आणि पिंपरी चिंचवडकरांचे नाते अनेक वर्षांचे. आजही ते अगदी घट्ट आहे. यशवंतराव चव्हाण, धनंजयराव गाडगीळ, अण्णासाहेब मगर यांच्या संकल्पनेतून या नगरीचा उदय झाला. नंतरच्या काळात शहराच्या वाटचालीत, जडणघडनीत सर्वात मोठा वाटा हा शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांचा आहे. इथल्या मातीला बारामतीचा सुगंध आहे म्हणतात. आजही शहरावर गावकी भावकीचा पगडा गेली ५० वर्षे कायम आहे. पवार साहेब म्हणजे इथे देव आहेत. माजी आमदार विलास लांडे यांच्या देव्हाऱ्यात साहेबांचा फोटो आहे, म्हणे. साहेब म्हणतील ती पूर्व दिशा, असा इथला खाक्या. शहराच्या सार्वजनिक क्षेत्रात कार्य असणाऱ्या प्रत्येकाची कुंडली त्यांच्या खिशात असते. राजकारण, समाजकारण, व्यापर, उद्योग, कामगार अशा प्रत्येक विभागात त्यांचे नाव. शहारात जे काही पूल, दवाखाना, शाळा, इमारती, उद्यान, जलतरणतलाव झालेत त्याच्या भूमिपूजन आणि उद्याटनाच्या फलकावर एकच नाव दिसते, ते म्हणजे शरद पवार. पिंपरी चिंचवडची दुसरी ओळख म्हणजे श्रमगरी, कामगारनगरी. इथे ज्या काही चळवळी, आंदोलने झाली त्याची सुरवात आणि शेवट हासुध्दा पवार यांच्याच नावावर आहे. गेल्या ५०-६० वर्षांत साहेबांनी राजकारणात जे काही नाव कमावले त्यात सिंहाचा नाही पण खारीचा वाटा हा या शहराचा आहे.

राजकारणातील ५० टक्के शागिर्द साहेब समर्थक –
राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय हा अगदी अलिकडचा. त्यापूर्वी समाजवादी काँग्रेस, काँग्रेस अशा राजकीय प्रवासात हे शहर आणि पंचक्रोशितील गावांच्या सरपंचापासून ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्यापर्यंत सारेच पवार यांच्या पाठिशी खंबीरपणे असतं. आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, माजी महापौर नाना शितोळे, तात्या कदम,नआझमभाई पानसरे, महमंदभाई पानसरे, शाम वाल्हेकर, शमिम पठाण, अरुण बाऱ्हाडे, रंगनाथ कुदळे, संजोग वाघेरे, शंकर पांढारकर, दिगंबर काळभोर, दिवंगत रंगनाथ फुगे अशी शेकडो नावे घेता येतील. १९९२ नंतर पवार यांनी सर्व सुत्रे त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडे सोपविली. पुढे साहेब समर्थक पडद्याआड गेले आणि दादांनी स्वतःचे वर्चस्व निर्मान केले. थेट साहेबांशी संपर्क असणाऱ्यांना दादांनी खड्यासारखे बाजुला केले (आझम पानसरे, शाम वाल्हेकर). वीस-पंचवीस वर्षे वारसा हक्काने आलेली पिंपरी चिंचवडची गादी ही शरद पवारांची होती, पण मालकी दादांची होती. जुन्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या प्रत्येक वेळी प्रचाराची सुरवात शरद पवार या शहरातून करत. एक मात्र नक्की, कामगार साहेबांवर कायम नाराज असतं, त्यामुळे या शहरातून जे मतदान होई त्यात नेहमीच विरोधात सूर असे.

टाटा, बजाज, एचए कंपन्यांचे दुखणे –
समाजवादी विचारांचे पवार साहेब नंतरच्या काळात काहीसे भांडवलदारांकडे झुकले, असे सार्वत्रिक चित्र होते. खरे तर, त्या काळात एक कुटुंब प्रमुख म्हणून व्यापक हिताची भूमिका त्यांनी घेतली होती म्हणून इथे कारखानदारी टिकली. आज हे वास्तव मान्य केलेच पाहिजे. १९८९ मध्ये टाटा मोटर्स कामगारांचा संप झाला. राजन नायर यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झाले त्याची झळा पूर्ण कारखानदारीला बसली. चिघळलेला संप शरद पवार यांनी अत्यंत शिताफिने मिटविला. अन्यथा स्वतः टाटा इथून सर्व गाशा गुंडाळायच्या तयारीत होते. १९९२-९३ मध्ये टाटा कंपनीच्या विस्तार प्रकल्पासाठी (मर्सिडीझ बेंझ) प्राधिकरणाची १८८ एकर जमीन दिली. त्यामागे मोठी गुंतवणूक आणि रोजगार यावा हा हेतू होता. त्यावेळी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केलेले आंदोलनही चार दिवसांत अलगद शमले, कारण होते शरद पवार. बजाज ऑटो कंपनी कामगारांचा लढा हा या शहराच्या कामगार चळवळीतील एक एतिहासिक क्षण आहे. त्या आंदोलनात तोडगा काढला तो पवार यांनी. उद्योगपती राहुल बजाज आणि शरद पवार यांचे ऋणानुबंध आजही कायम आहेत. एचए (हिंदुस्थान एन्टिबायोटिक्स) कंपनी गेली वीस वर्षे आजारी आहे. या कामागारांच्या संघटनेचे अध्यक्ष कोणीही असो त्यांच्या दुखण्यावर केंद्र सरकारची मदत मिळवून देण्याचे औषध पवारच देतात. हिंजवडी आयटी पार्कला राजीव गांधी यांचे नाव असले तरी त्याला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरुप दिले ते शरद पवार यांनी. आज एका आयटी पार्क मुळे पुणे पिंपरी चिंचवडचे पूर्ण अर्थकारण हजार पटीने पुढे गेले. पाच लाख रोजगर आला. याचे श्रेय निश्चितच शरद पवार यांना जाते.

जेएनएनयूआरएम असो वा स्मार्ट सिटी –
पूर्वीचे युपीए सरकार असाना केंद्रांत कृषीमंत्री असतानाही पवार यांचे लक्ष पिंपरी चिंचवडकडे कायम होते. त्या काळात जेएनएनयुआरएम (जवाहरला नेहरू नागरी पुर्नविकास योजना) मध्ये फक्त पुणे शहर होते. शरद पवार यांनी त्या यादीत पिंपरी चिंचवडचे नाव समिविष्ठ केले म्हणून २००० कोटींचा निधी मिळाला. नतर २०१४ मध्ये भाजपाचे नरेंद्र मोदी सरकार आले. त्याहीवेळी स्मार्ट सिटी मध्ये फक्त पुणे होते, पण नंतर शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड स्वतंत्र शहरचा त्यात घेणे भाग पाडले, असे म्हणतात. लहान मोठ्या अशा अनेक योजनांचा लाभ या शहराला मिळाला त्याचे कारण शरद पवार होते. शहराच्या कोणत्याही दिशेला तुम्ही दगड मारा, तो जिथे पडेल तिथे पवार यांचे नाव दिसेल. इतके या जमिनीशी त्यांचे नाते आहे.