“शरद पवार यांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची”

0
868

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यावर आधारित ‘पॉवर ट्रेडिंग’ हे पुस्तक सध्या चांगलेच चर्चेत आहे. या पुस्तकात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलल्याचा उल्लेख आहे. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सगळा वृत्तांत सांगितला आहे. शरद पवार यांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या सोबत येण्याचे मान्य केले होते. काळाच्या ओघात सर्व घटना उघड होतील, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.

‘पॉवर ट्रेडिंग’ पुस्तकाच्या लेखिका प्रियम गांधी यांनी बुधवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलतानाही यासंदर्भातील अनेक मुद्द्यांचा खुलासा केला होता. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला भाजपला पाठिंबा देण्याचे ठरवले होते. त्यासाठी राष्ट्रवादीतील एका माजी केंद्रीय नेत्याच्या माध्यमातून भाजपशी बोलणी सुरु होती. अमित शाह यांच्या निवासस्थानी शाह, शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी एक बैठक नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पार पडली होती. मात्र, त्यानंतर शरद पवार यांनी अचानक आपली भूमिका बदलल्याचे प्रियम गांधी यांनी सांगितले होते.

‘आम्ही इंदिरा गांधींचं ऐकलं नाही तर तुम्ही कोण आहात?’
“संजय राऊत यांनी आम्हाला दम दिला. त्यांना आम्हाला सांगायचं आहे की असे दम-बिम देण्याची भाषा करु नका. ही भाजप आहे. आम्ही इंदिरा गांधींना ऐकलं नाही, तर तुम्ही कोण आहात. सर्व राज्य एका कुटुंबासाठी चालवलं जात आहे. तुम्ही कितीही दबाव आणला, तरी ही भाजप जनतेचा आवाज बुलंद करेल” असा इशारा भातखळकरांनी दिला.

“महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी दमबाजीची भाषा करतात. आम्ही तुमच्या अंगावर येऊ, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत, असं मुख्यमंत्री म्हणतात. मी त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो की आज संविधान दिवस आहे. कायद्याचे राज्य आहे, त्यांचं नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा करणे गैर तर आहेच, पण 100 टक्के घटनाविरोधी आहे” असंही भातखळकर म्हणाले.