शरद पवार मुख्यमंत्री असताना अभ्यासक्रमात काय होते, याचा अभ्यास मुंडेंनी करावा- विनोद तावडे

0
1215

मुंबई , दि. १४ (पीसीबी) – छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूराप्रकरणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांना  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यावेळी अभ्यासक्रमात काय होते आणि त्यात नंतर  कसे बदल करण्यात आले, याचा अभ्यास धनंजय मुंडे यांनी करावा, असा टोला तावडेंनी लगावला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर छापलेल्या पुस्तकाची पाहणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सात दिवसात आपला अहवाल सादर करणार आहे, अशीही माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज (रविवार) येथे दिली.

या पुस्तकात तुकाराम महाराजांच्या पत्नीची भाषा शिवराळ आहे, असेही लिहिल्याचे आढळून आले  आहे. सदानंद मोरे यांना आम्ही संभाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पुस्तकांची पाहणी करण्यासाठी सांगितले आहे. सात दिवसात याचा अहवाल सादर होईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले. त्याचबरोबर  अहवाल सादर होईपर्यंत पुस्तकाचे वितरण  थांबवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.