शरद पवार माढ्यातून लोकसभा लढवणार

0
781

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  माढा लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.  शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे,  अशी माहिती पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज ( गुरुवारी) मुंबईत पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसबरोबर आतापर्यंत जागावाटपाबाबत झालेल्या वाटाघाटी, पक्षाच्या वाट्याला येणारे मतदारसंघ, काही जागांबाबत निर्माण झालेला पेच, इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, या बैठकीत माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली.  त्यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह आम्ही त्यांच्याकडे केला. आमच्या विनंतीला मान देऊन ते लोकसभा निवडणूक लढवतील, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीत संभाव्य उमेदवारांसंदर्भात चर्चा करण्यात आली. मात्र, अंतिम निर्णय झालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी निश्चित  असून इतर घटकपक्षांशी चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आघाडीच्या अंतिम उमेदवारांची यादी चार ते सहा दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.