Maharashtra

शरद पवार भेटणार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना

By PCB Author

August 05, 2022

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – कथित पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत. राऊतांवरील कारवाईनंतर संपूर्ण राज्यात शिवसैनिकांनी आंदोलने करून भाजपा तसेच ईडीविरोधात घोषणाबाजी केली होती. तर विरोधात असणाऱ्या शिवसेना पक्षासहित काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने या कारवाईवर आक्षेप नोंदवला होता. राष्ट्रवादीचे अक्ष्यक्ष शरद पवार यांनी मात्र या प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही नसू ते आज (५ ऑगस्ट) संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. तसे वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे. पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हेदेखील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर शरद पवार यांनी थेट भाष्य केलेले नाही. शरद पवार यांनी अद्याप मौन का बाळगले आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबीय जनतेला उत्तरदायी आहे, असे उत्तर दिले होते. राष्ट्रवादी पक्षातील अन्य नेत्यांनी राऊतांच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिलेल्या असताना पवार अद्याप मौन का बाळगून आहेत, असे विचारले जात होते. असे असताना शरद पवार आज संजय राऊत यांच्या मैत्री या बंगल्यावर जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्योबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यादेखील असू शकतात. शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर ते राऊतांच्या घरी जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य ती तयारी केली जात आहे.

दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन्स कोर्टाने राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ केली आहे. न्यायालयाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावलेली आहे. याआधी न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती.