शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट; शिवसेनेला पाठिंबा देण्यावर होणार निर्णय

0
482

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असून बैठकांच्या माध्यमातून विचारमंथन सुरु आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित सरकार स्थापन करण्यासाठी सकारात्मक असून सामायिक कार्यक्रम ठरवला जात आहे. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर आता दिल्लीत बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंबंधी चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

मुंबईत मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत शिवसेनाला पाठिंबा देण्यासंबंधी चर्चा झाली होती. या बैठकीला काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली यासंबंधी अहमद पटेल सोनिया गांधी यांना रिपोर्ट देणार आहेत. दरम्यान १७ नोव्हेंबरला शरद पवार आणि सोनिय गांधी यांच्यात दिल्लीत बैठक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

दरम्यान शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेसाठी समन्वयाची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली. हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत जवळपास सव्वा तास चर्चा झाली. यावेळी काय चर्चा झाली हे मात्र उघड करण्यात आलेलं नाही.