Maharashtra

शरद पवार असतील, तिथे राज ठाकरे पोहोचतात, त्यानंतर पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार होते – विनोद तावडे   

By PCB Author

April 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभांमधून भाजप आणि पंतप्रधान मोदी यांची पोलखोल करून हादरे देण्यास सुरूवात केली आहे. राज ठाकरेंचे हल्ले भाजपला वर्मी लागण्याचे दिसत आहे. कारण पुन्हा एकदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.     

जिथे शरद पवार असतील, तिथे राज ठाकरे पोहोचतात, तिथे दोघांमध्ये गुफ्तगू होते आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार होते, असा टोला विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.   सोलापूरमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार  हल्ला चढवला होता.  त्यावर आज (मंगळवार)  विनोद तावडे यांनी  पलटवार केला आहे.

विनोद तावडे म्हणाले की,  मंगळवारी  रात्री राज ठाकरे यांच्या टुरींग टॉकिजचा शो पाहिला होता. राज यांनी ते कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक हे आता जाहीर करावे. राज यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर न देता तावडे म्हणाले की, समज कमी असली की असे आरोप केले जातात.

जर आमच्या योजना फसलेल्या असतील, तर ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका, महापालिका येथे होणारा भाजपचा विजय आणि मनसेचा गाशा गुंडाळला जाणे, हे कशाचे प्रतीक आहे?  असा सवालही तावडे यांनी राज यांना केला आहे.