Maharashtra

शरद पवारांविरोधात निवडणूक लढवण्यास तयार – महादेव जानकर

By PCB Author

February 14, 2019

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रभाव आता कमी झाला आहे, त्यामुळे जर भाजपने आपल्याला तिकीट दिले, तर माढा लोकसभा मतदारसंघातून आपण शरद पवारांविरोधात लढू, असे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स विकास मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

शरद पवार  माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे आज (गुरुवारी) निश्चित झाले आहे. त्यामुळे शरद पवारांना जर टक्कर द्यायची असेल, तर त्यांच्याविरोधात भाजपने आपल्याला तिकीट द्यावे, अशी इच्छा जानकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच आपल्याला महाराष्ट्र केसरी नव्हे, तर हिंद केसरी व्हायचे आहे, असेही जानकर म्हणाले.

दरम्यान, लोकसभेसाठी एनडीएकडे आम्ही ६ जागा मागितल्या आहेत, असे जानकर यांनी सांगितले. बारामती, माढा, परभणी, बीड, ईशान्य मुंबई आणि अमरावती या जागा आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाला मिळाव्यात, अशी मागणी आपण केल्याच्या त्यांनी सांगितले.