शरद पवारांवरील टीकेला रोहीत पवारांकडून प्रत्युत्तर

0
634

पुणे, दि. ३ (पीसीबी) – गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं?  डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचे राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखे वाजत असत,  अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार यांनी भाजपला उत्तर दिले आहे.

सोलापुरातील भाजपच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर  टीका केली होती. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते सांगावे, असा सवाल शहा यांनी केला होता. यावर रोहीत पवार यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून खरपूस समाचार घेतला आहे.

यात त्यांनी म्हटले आहे की, साहेबांच राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवाव अस निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. साहेबांमुळे ज्याने शेतीतून चार पैसै कमावले त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली आणि त्याचा नातू आज  आयटी  कंपनीत नोकरी करु शकतो. शेती पासून ते आयटी पार्क उभा करण्यापर्यंतची ही शृंखला आहे.

महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दिनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता साहेबांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसे जोडणारा हा इतिहास आहे.

सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे. तर घरात आमदारकी पासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पीठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय. चांगली मशागत करुन ठेवुया.