शरद पवारांनी माढा, सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा घेतला आढावा

0
511

वाई, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर सातारा मुक्कामी आलेल्या शरद पवारांनी पक्षाच्या आजी-माजी आमदारांसोबत बंद दाराआड चर्चा केली. ही बैठक जिल्ह्यातील दुष्काळाबाबत झाल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यामध्ये माढा आणि सातारा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, निवडणुकीनंतरच्या पवारांच्या या पहिल्याच दौऱ्यावेळी खासदार उदयनराजे भोसले अनुपस्थित होते.

कर्मवीर भाऊ राव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्यानिमित्ताने पवार सातारा मुक्कामी दाखल झाले. या दौऱ्यातच पवारांनी आज पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बंद दाराआड बैठक घेतली. या बैठकीस पवारांसोबत अजित पवार, रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे आदी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने पक्षासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या माढा आणि सातारा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. माढय़ात स्वत: पवारांनी माघार घेतल्यामुळे, तर साताऱ्यात पक्षांतर्गत गटबाजीमुळे या दोन्ही ठिकाणच्या लढती पक्षासाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.

माढा मतदारसंघाला सातारा जिल्ह्य़ातील फलटण, माण आणि खटाव हे तीन तालुके जोडलेले आहेत. या तीनही तालुक्यात यंदा भाजप उमेदवारास पूरक वातावरण पाहण्यास मिळाले. भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे फलटणचे असल्याने तालुक्यातील उमेदवार म्हणून त्यांच्या उमेदवारीबाबत फलटणमध्ये उत्साह होता, तर माण आणि खटाव या तालुक्यातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्हीही गटांनी निंबाळकरांना जाहीर पाठिंबा दिला होता. येथील काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि विरोधी शेखर गोरे या दोन्ही नेत्यांनी निंबाळकरांचा जाहीर प्रचार केला होता.

माढय़ाखालोखालच सातारा येथील लढतही यंदा सुरुवातीपासून चर्चेत होती. येथील उदयनराजे यांच्या उमेदवारीस जिल्ह्य़ातील पक्षाच्या सर्व आमदारांचा प्रखर विरोध होता. राष्ट्रवादीची उदयनराजे विरुद्ध अन्य सर्व लोकप्रतिनिधी अशी जिल्ह्य़ात विभागणी झाली होती. या पाश्र्वभूमीवर पवारांनी निवडणुकीपूर्वीच या दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणला होता. मात्र नेत्यांमध्ये झालेला हा समेट कार्यकर्त्यांच्या पातळीवर अखेपर्यंत दिसला नाही. यामुळे सातारा  मतदारसंघातही मतदान नेमके कुठल्या दिशेने झाले आहे याबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. सध्या माढा आणि सातारा या दोन्ही मतदारसंघातील निकालाबाबत कमालीची चुरस असल्याने नेमके काय घडणार याबाबत सगळय़ांचेच लक्ष लागलेले आहे.

या संभाव्य धक्कादायक निकालांच्या पाश्र्वभूमीवरच पवारांनी आज पक्षाच्या आजी-माजी आमदारांबरोबर बंद दाराआड चर्चा केली. या वेळी पवारांनी प्रत्येक विधानसभानिहाय झालेल्या मतदान आणि घडामोडींची माहिती घेतल्याचे समजते. बंद दाराआडची ही बैठक संपल्यावर मात्र त्यामध्ये जिल्ह्य़ातील दुष्काळावर चर्चा केल्याचे माध्यमांना सांगण्यात आले. दरम्यान निवडणुकीनंतरच्या पवारांच्या या पहिल्याच दौऱ्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या कार्यक्रम, बैठकीस दांडी मारली आहे. त्यांच्या या अनुपस्थितीची सर्वत्र चर्चा होती.

..तर मतदानयंत्रात गडबडीचा संशय

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची स्थिती चांगली आहे. त्यामुळे पक्षाला यश नक्की मिळेल. मात्र असे असताना विरोधी निकाल लागण्याबाबत काही जण दावा करत आहेत. तसे निकाल प्रत्यक्षात लागले तर त्यांनी मतदान यंत्रात (इव्हीएम मशिन) गडबड केली असल्याचे म्हणावे लागेल असा आरोप शशिकांत शिंदे यांनी या वेळी केला.