Banner News

शरद पवारांनी मतासाठी राजकारण करू नये – मुख्यमंत्री

By PCB Author

September 16, 2019

कराड,  दि. १६ (पीसीबी) –   राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कोणतेही  विधान करताना विचार केला पाहिजे. त्यांच्या विधानामुळे  भारताला फायदा होईल की पाकिस्तानला याचा विचार करायला हवा. मतांसाठी राजकारण करू नये, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिला आहे.

कराड येथे महाजनादेश यात्रा आली असता  मुख्यमंत्री  पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्री  म्हणाले की,  पाकिस्तानचे कौतुक केल्याने मुसलमान खूश होतील आणि मतदान करतील या भ्रमात त्यांनी राहू नये. भारतातील मुसलमान देशाभिमानी आहेत. पवारांच्या या वक्तव्यातून राष्ट्रवादीची मानसिकता दिसून येते. निवडणुका येतील आणि जातील. पण मते घेण्यासाठी अशी  विधाने  करू नयेत.

दरम्यान, शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानात गेल्यानंतर माझे चांगले स्वागत करण्यात आले. भारतात येऊन पाकिस्तानमधील नागरिकांना भलेही त्यांच्या नातेवाईकांना भेटता येत नसेल, मात्र तिकडे गेलेल्या व्यक्तीला पाकिस्तानमधील नागरिक आपल्या नातेवाईकांप्रमाणेच पाहुणचार करतात. पाकिस्तानमधील स्थिती न पाहता आपल्याकडे पाकिस्तानी नागरिकांविषयी गैरसमज निर्माण केले जात आहेत. राजकीय लाभ उचलण्यासाठीच तेथील जनतेबाबत द्वेषाची भावना निर्माण केली जात आहे, असे पवारांनी म्हटले होते.