शरद पवारांनी कमरेखालची भाषा करणे योग्य नाही – महादेव जानकर

0
500

नाशिक, दि. १६ (पीसीबी) – विरोधकांनी  जबाबदारीने बोलावे. लोकशाही आहे म्हणून काहीही बोलू नये. त्यांच्या प्रश्नांना आम्ही उत्तर देऊ.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  फक्त महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचेही नेते आहेत. त्यांनी कमरेखालची भाषा करणे योग्य नाही, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी  म्हटले आहे.

जानकर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मी नाराज असलो तरी आता भाजपसोबत आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. आम्हाला कोणतेही आश्वासन दिलेले नाही. फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महायुतीत आहोत. महायुतीत भाजपच सगळ्यात बलवान आहे. भाजपच सगळ्यांचा मोठा भाऊ, असेही जानकर म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कोणालाही मोठे हेऊ दिले नाही. सगळे स्वतःच्या ताब्यात ठेवले, असा आरोप जानकरांनी केला. ‘महात्मा फुले’ यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. तशी केंद्राला शिफारस केली आहे, असे  जानकर यांनी  यावेळी सांगितले.