शरद पवारांना फक्त खुर्ची दिसते, बाकी त्यांना काही नको; उद्धव ठाकरेंचा टोला

0
509

कोल्हापूर, दि. २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज फुटला आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी कोल्हापूरात अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली.

काँग्रेस राष्ट्रवादीतील बडे नेते आज शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना मात्र आता भाजपमध्ये घेऊ नका, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच शरद पवारांना फक्त खुर्ची दिसते, बाकी त्यांनी काही नको, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

दरम्यान माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मला पळवापळवी करायची नाही म्हणून साताऱ्यासाठी नरेंद्र पाटलांना मागून घेतले आहे. माथाडी कामगारांचा नेता मला दिल्लीला पाठवायचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे साताऱ्यात उद्यनराजे भोसले विरूद्ध नरेंद्र पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे.

शिवसेना भाजप युतीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील जनतेला आपल्याला एकत्र बघायचे होते. त्यामुळे आज आपल्याला पाहण्यासाठी ते मोठ्या संख्येने इथे जमले आहेत. त्यामुळे ही युती का केली याचे कारण द्यायची आता मला गरज वाटत नाही.