शरद पवारांना गुरू मानतो, पण अंगठा देणार नाही – भगतसिंह नाईक

0
1340

सांगली, दि. १ (पीसीबी) – सांगलीतील शिराळा तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भगतसिंह नाईक यांनी पक्षाला रामराम केला आहे. राष्ट्रवादीत मला गृहितच धरले जात नसून माझे पक्षात झिरो स्थान आहे, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली आहे. शरद पवारसाहेबांना मी गुरू मानतो, त्यांच्यासाठी गरज पडल्यास त्यांना मी मुंडके देईन, पण अंगठा देणार नाही,  अशा शब्दांत  नाईक यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.    

राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंग नाईक यांचे चुलत बंधू असलेले भगतसिंग यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात  आहे. पक्षात माझी गळचेपी होत होती. याकडे पक्षनेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे  गाऱ्हाणी मांडली, मात्र त्यांनी गांभिर्याने लक्ष दिले  नाही, असे ते म्हणाले.

भगतसिंह म्हणाले की,  पक्षस्थापनेपासून मी जिल्ह्यातील पहिला सदस्य व तालुकाध्यक्ष आहे. पक्षसंघटना मजबूती करण्याचे मी काम केले आहे. गेल्या पंधरा वर्षापासून  अपेक्षित अशी कोणतेही काम  झालेली नाहीत. माझा कोणत्याही नेत्यावर आक्षेप नसून नेत्यांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न त्यांच्याजवळ वावरणाऱ्यांनी केला आहे.  पक्षात मला सारखे डावलले जात होते.  माझ्यावर राष्ट्रवादी लेबल असल्याने कोणता निर्णय घेण्यात अडचण येत होती, असे ते म्हणाले.