Pimpri

शरद पवारांचे मोठे भाकीत; मोदी पुन्हा सत्तेत आल्यास सरकार १५ दिवसांत कोसळणार  

By PCB Author

May 14, 2019

बारामती, दि. १४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी  पंतप्रधान  मोदी यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले, तरी या सरकारची अवस्था वाजपेयी यांच्या १९९६ च्या सरकारसारखी होईल.  मोदी  सरकार अवघ्या १३ किंवा १५ दिवस  कोसळेल, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

पवार एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पवार यांनी नातू रोहित पवार यांच्यासह     पहिल्यांदाच एकत्रित मुलाखत दिली आहे.

पवार म्हणाले की, भाजप विरोधातील सर्व पक्षांची मोट बांधण्याचे काम सुरु असून त्याला २१ मे रोजी मूर्त रुप येईल. आमच्या घरात सगळे निवडणुकीत सहभागी होतात. रोहित शिक्षण, शेती या प्रश्नाबाबत लक्ष देतात. आमच्या कुटुंबातील सगळे निवडणुकीत जबाबदारी समजून काम करतात. निवडणूक संपली की आपले काम करतात. रोहित चांगली इंडस्ट्री चालवतो, शेतकऱ्यांशी त्याचा संपर्क आहे.

रोहित पवार यांच्या उमेदवारीबाबत अजून पक्षाने विचार केला नाही, पक्ष निर्णय घेईल. मावळमध्ये आमचा  परभाव झाला आहे. तेव्हा त्या भागातील लोकांनी पार्थचे नाव सुचवले,  म्हणून त्याच्या उमेदवारीचा  निर्णय झाला. लोक सांगतात रोहितला उमेदवारी द्या, तो लक्ष घालतो, कर्जत जामखेडमध्ये पण आमचा सतत पराभव झालेला आहे. तो मतदारसंघ जिंकायला राष्ट्रवादीला जो उपयुक्त उमेदवार वाटतो, तो उमेदवार देऊ, असे पवार यांनी सांगितले.