Maharashtra

शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करणार- बिचकुले

By PCB Author

October 01, 2019

सातारा, दि. १ (पीसीबी) – बिग बॉस फेम आणि साताऱ्यातील नेते अभिजित बिचुकले उलटसुलट विधाने करून कायम चर्चेत राहतात. आता त्यांनी असेच एक विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अपुरे राहिलेले पंतप्रधान होण्याचे स्वप्न  मी पूर्ण करणार आहे.   मी स्वत: पंतप्रधान होईन, असे त्यांनी म्हटले आहे.

साताऱ्यातील विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूक या दोन्ही निवडणुका मी  लढवणार  आहे. सातारा जिल्ह्याने शरद पवार यांना मोठे केले. त्यामुळे सातारकर मलाही मोठे करतील, असा विश्वासही बिचुकले यांनी  व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवल्या असत्या, मात्र आता २८८ जागा लढवण्यासाठी सध्यातरी माझ्याकडे तेवढा वेळ नाही, असे बिचुकले यांनी म्हटले आहे.

साताऱ्यातील दोन्ही राजे टोलनाका, दारुचे दुकान, कार्यकर्ते या क्षुल्लक गोष्टींसाठी भांडत असतात, त्यामुळे यंदा सातारकरांनी नीट विचार करावा. या दोन्ही राजांना राजे राहू द्या आणि तुमच्या अभिजित बिचुकलेला विधानसभा आणि लोकसभेत पाठवा, असे आवाहन बिचुकले यांनी यावेळी केले.