दिलासादायक बातमी! शरद पवारांची पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा; पत्रकार परिषद घेत दिली माहिती

0
231

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून पावसाने झोडपून काढलं. आणि यामध्ये बरीच जीवित तसेच वित्तहानी सुद्धा झाली. दरम्यान, याच पार्श्वभूमीवरती शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राला अशा संकटांचा अनुभव आहे असं सांगताना त्यांनी पूरस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करणार अशी माहिती दिली आहे.

शरद पवार यांनी पूरस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करणार अशी माहिती दिली आहे. दरम्यान एकूण १६ हजार कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे अशी माहिती देताना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना जीवनाश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवारांनी यावेळी नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरै टाळावेत असं आवाहनही केलं. “सहा ते सात जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांसहित अन्य जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. त्यांना मदत करण्याची गरज आहे. पूरस्थिती अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करुन जबाबदारी घेईल,” असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

“महाराष्ट्राला अशा संकटांचा अनुभव आहे. माळीणमधील दुर्घटनेनंतर सरकार आणि स्थानिक नेते यांनी पुनर्वसन केलं होतं. पुनर्वसन कसं करतात याचा अनुभव घेतला,” असं शरद पवारांनी सांगितलं. तसंच १६ हजार कुटुंबांना पुराचा फटका बसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. “१६ हजार कुटुंबांची माहिती मिळाली आहे. चिपळूण, खेडमधील पाच हजार; रायगड महाडमधील पाच हजार, कोल्हापुरातील दोन हजार, सातारामधील एक हजार आणि सांगलीतील दोन हजार लोकांना फटका बसल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना भांडी, कपडे, अंथरुण अशा जीवनाश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे. याशिवाय वैद्यकीय पथकं पाठवणार आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांत ही मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” अशी माहिती शरद पवारांनी दिली.

शरद पवार यांनी यावेळी नेत्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करु नये असं आवाहन केलं. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तिथे गेलंच पाहिजे. नेमकी वस्तूस्थिती काय आहे याचा आढावा त्यांनी घेतलाच पाहिजे. पण इतरांनी जाऊ नये. मी गेलो तर यंत्रणेतील लोक माझ्याभोवती जमा होतील. यामुळे ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यावरुन लक्ष विचलित होईल. माझा पूर्वीचा अनुभव आहे. विशेषतः लातूरचा. कारण नसताना अनेक लोक अशा ठिकाणी दौरे करतात. माझं अशा सर्वांना आवाहन आहे की, पूरग्रस्त भागात शासकीय यंत्रणा, स्थानिक संस्था आणि कार्यकर्ते पूनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल, अशा पद्धतीचे दौरे टाळण्याचा प्रयत्न करा. मला आठवतं की, लातूरला असताना आम्ही कामात होतो. त्यावेळी पंतप्रधान नरसिंहराव पाहणीसाठी येणार होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना फोन केला आणि त्यांना येऊ नका अशी विनंती केली. दहा दिवसांनी या असं त्यांना म्हणालो. तुमच्या इथली यंत्रणा तुमच्याभोवती केंद्रीत होईल असं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांनीही दौरा रद्द केला”, असं सांगत पवार यांनी पूरग्रस्त भागात दौरे न करण्याचं आवाहन राजकीय नेत्यांना केलं.