Maharashtra

शरद पवारांचा धडका; बीड जिल्ह्यातील पाच उमेदवार जाहीर

By PCB Author

September 18, 2019

बीड, दि. १८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवार)  बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची अचानक घोषणा केली. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासह सर्व तुल्यबळ  उमेदवार  मैदानात उतरवले आहेत. तर आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु, असे पवारांनी यावेळी  सांगितले.  

बीड जिल्ह्यात आज पवारांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.  परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून विजयसिंह पंडित, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावातून माजी मंत्री प्रकाश सोळंके व केजमधून नमिता मुंदडा राष्ट्रवादीकडून रिंगणात असतील.

परळीतून धनंजय मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या भावा-बहिणीमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.  तर, राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करून मंत्री झालेले  जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या संदीप यांना उमेदवारी दिली आहे.  त्यामुळे येथेही काटाजोड लढत होण्याची शक्यता आहे.