Pune

शरद पवारांचा दोन अंकी संख्या वाचवण्याचा प्रयत्न – चंद्रकांत पाटील

By PCB Author

October 06, 2019

पुणे, दि. ६ (पीसीबी) – राज्यभरात महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत  असून  महायुतीचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील. मात्र,  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता आपली दोन अंकी संख्या वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,  असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, राज्यसभा खासदार संजय नाना काकडे, कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, योगेश मोकाटे, पृथ्वीराज सुतार आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोल्हापूरचा सर्वांगीण विकास केला तसाच विकास पुढच्या पाच वर्षात पुणे जिल्ह्याचा करायचा आहे.  कोथरुड मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाल्याने शंका व्यक्त केली जाते की, पाटील  सहज उपलब्ध होतील की नाही? पण मी जसे कोल्हापूरमध्ये सहज उपलब्ध असायचो, राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून लोकांना सहज उपलब्ध होण्यासाठी मंत्रालयासमोरचाच बंगला निवडला. त्याच प्रकारे कोथरूडकरांना मी सहज उपलब्ध असेल, यासाठी मी संपूर्ण नियोजन करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.