शरद पवारांचा कार्यकर्त्यांवर विश्वास नाही, त्यामुळे ते घरातच उमेदवारी देत आहेत – चंद्रकांत पाटील

0
788

कराड, दि. १७ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांबद्दल विश्वासच राहिलेला नाही, त्यामुळे ते घरातच उमेदवारी देत सुटले आहेत, अशी टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कराडमध्ये बोलताना केली.

माढय़ातून पवार स्वत: किंवा त्यांचा कोणीही उमेदवार उभा राहिला तरी भाजपचाच उमेदवार जिंकेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त करून विरोधकांचा उमेदवार कोण? यावर माढय़ातील भाजपचा उमेदवार ठरणार असल्याचे  सांगितले.  भाजप-सेना युतीबाबत आठवडय़ाभरात निर्णय होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पाटील म्हणाले, की  बारामती, मावळ, माढा  मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. यातील अनेकजण इच्छुकही होते. मात्र पवारांचा त्यांच्याच कार्यकर्त्यांवर विश्वासच राहिलेला नाही, त्यामुळे ते घरातच उमेदवाऱ्या देत सुटले आहेत.

माढा मतदार संघातील आपला उमेदवार कोण? यावर  उत्तर देताना ते म्हणाले, की राजकारणातील गणिते लगेचच उघड केली जात नाहीत. विरोधकांचा उमेदवार कोण यावर आमचा म्हणजेच युतीचा उमेदवार निश्चित होईल, असे पाटील यांनी सांगितले.