शबरीमला मंदिराचे दरवाजे उघडणार; महिला पत्रकारांना वार्तांकनासाठी मज्जाव

0
576

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – विशेष पूजेसाठी केरळच्या शबरीमला मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत. काही तास हे दरवाजे खुले असणार आहेत. मात्र या दरम्यान वर्तांकनासाठी महिला पत्रकारांना येण्यास मज्जाव घातला गेला आहे. गेल्यामुळे झालेल्या हिंसाचाराची पार्श्वभूमी लक्षात घेता मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयप्पाचे दर्शन शांतपणे घेतले जावे, भाविकांना कोणत्याही अडचणींचा किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागू नये म्हणून २३०० पोलीस मंदिर परिसरात तैनात करण्यात आले आहेत अशी माहितीही समजते आहे.

२३ पोलिसांमध्ये १०० महिला पोलिसांचेही एक पथक तैनात करण्यात आले आहे. शनिवारी रात्रीपासून पुढचे ७२ तास पम्बा, निल्क्कल, इवलुगल, सन्निधानमन या परिरसांमध्ये कलम १४४ अर्थात जमावबंदीचा आदेशही देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा निर्णय मान्य केल्यानंतर हे मंदिर दुसऱ्यांदा उघडले जाणार आहे. गेल्या महिन्यात जेव्हा हे मंदिर उघडले गेले होते तेव्हा या मंदिर परिसरात बराच गदारोळ बघायला मिळाला होता. पोलीस आणि आंदोलक यांच्यातही वादावादी झाली होती.

त्रावणकोर चिथिरा थिरुनलचे शेवटचे महाराज बलराम वर्मा यांच्या जयंतीनिमित्त हे मंदिर संध्याकाळी पाच वाजता उघडले जाईल. त्यानंतर पाच तासांसाठी ते खुले असेल. आज रात्री १० वाजता हे मंदिर पुन्हा बंद करण्यात येईल. मंदिराचे मुख्य पूजारी उन्नीकृष्णन नंबूदिरी हे या मंदिराचा दरवाजा उघडतील. अनेक हिंदू संघटनांनी या मंदिरात महिला पत्रकारांना पाठवू नये अशीही भूमिका घेतली आहे. गेल्या महिन्यात महिला पत्रकारांना धक्काबुक्की झाली होती, तसेच काही चॅनल्सच्या गाड्याही फोडण्यात आल्या होत्या. तसा कोणताही प्रकार आज घडू नये म्हणून अनेक हिंदू संघटनांनी महिला पत्रकारांना ही बातमी कव्हर करण्यासाठी पाठवू नये यासंदर्भात पत्रे पाठवली आहेत.