शक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी, ही तर आर्थिक दहशतवादाची सुरुवात – शिवसेना

0
1118

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – केंद्र  सरकारला सत्य सांगणारे लोक नकोत व होयबा हवेत. शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक त्याच हेतूने झाली असेल, तर ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे, अशी टीका शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या, रिझर्व्ह बँकेतील ‘गंमत’या अग्रलेखातून केली आहे. 

रिझर्व्ह बँकेचे  गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या  राजीनाम्यानंतर  केंद्र सरकारने अवघ्या चोवीस तासांत माजी आर्थिक सल्लागार व वित्त आयोगाचे सदस्य शक्तिकांत दास यांची नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीवरुन केंद्र सरकारवर टीका सुरू असून अर्थ क्षेत्रातून आणि विरोधीपक्षांकडून दास यांच्या नियुक्तीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यात आता शिवसेनेने हल्ला चढवला आहे.

शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती याच हेतूने झाली असेल, तर ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे. भाजपचे  खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी शक्तिकांत दास यांच्यावर गंभीर आरोप केले व हे सर्व आरोप कागदावरील आहेत. तरीही दास यांना देशाच्या सर्वोच्च आर्थिक संस्थेच्या शिखरावर बसवले जाते हे धक्कादायक आहे. शक्तिकांत यांची नेमणूक म्हणजे रिझर्व्ह बँकेतील ‘गंमत’ आणि अर्थव्यवस्थेशी ‘खेळ’ व्हायला नको. दास हे राजकारण्यांशी चांगले संबंध ठेवून आहेत. येथे प्रश्न महागाई व अर्थव्यवस्थेचा आहे. राजकारण्यांनी निर्माण केलेली ही भुताटकी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर कशी आटोक्यात आणणार? असा सवाल या अग्रलेखात शिवसेनेने उपस्थित केला आहे.