Pimpri

शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकणारे ‘ते’ आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपींकडून मोठा खुलासा

By PCB Author

November 24, 2021

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) : आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू, बांधकाम व्यावसायिक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर ज्वलनशील पदार्थांनी भरलेल्या बाटल्या फेकल्या. ही घटना मंगळवारी (दि. 23) दुपारी तीन वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी तिघांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल राम साळुंके (वय 39, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 308, 436, 511, 336, 34, ज्वालाग्राही पदार्थ अधिनियम 1908 चे कलम 3, 4, 5, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे सौदागर येथे त्यांचे चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रा ली हे कार्यालय आहे. एका दुचाकीवरून तिघेजण मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आले. त्यातील दोघांनी कार्यालयावर कार्यालय नष्ट करण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ भरलेल्या दोन बाटल्या फेकून मारल्या. मात्र, एक बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर पडला. तर दुसरा रस्त्यावर पडला आहे.

सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. शंकर जगताप आणि त्यांच्या कार्यालयात काम करणारा स्टाफ यावेळी कार्यालयात हजर होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली होती. तीन आरोपींपैकी दोघांना पिंपरी-चिंचवड शहरातून तर एकाला शहराच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी केवळ नाव कमावण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्याप अटकेची आणि इतर कायदेशीर प्रक्रिया शिल्लक असून मूळ उद्देशापर्यंत पोलीस पोहोचले नाहीत. अटक प्रक्रिया पूर्ण करून आरोपींना न्यायालयात हजर करायचे आहे. त्यानंतर चौकशीत सर्व बाबी समोर येतील असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितले.