व्हायरल व्हिडीओ बनावट; माझी बदनामी करण्याचा प्रयत्न; धनंजय मुंडेंचा खुलासा

0
556

मुंबई, दि. २० (पीसीबी) –  पंकजा मुंडे यांच्या विरोधात व्हायरल होत असलेला व्हिडीओ बनावटी असून ती क्लिप एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. व्हिडीओ क्लिप माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते  धनंजय मुंडे यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी धनंजय मुंडे  त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा  दाखल  केला आहे.

याबाबत धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट  टाकून खुलासा केला आहे. शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका, अशी विनंती आहे, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.