व्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी

0
604

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – घाटकोपरमधील व्यावसायिक राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवार याला १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणात पंतनगर पोलिसांनी टीव्ही मालिकेत काम करणारी अभिनेत्री देबोलीना भट्टाचार्यचा जबाब नोंदवून सोडून दिले आहे.

घाटकोपरमध्ये राहणारे राजेश्वर उदानी हे हिरे आणि सोने- चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी होते. ५७ वर्षीय उदानी हे २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. अंधेरीला जातो असे सांगून ते घरातून निघाले. पण त्यादिवसापासून ते घरी परतलेच नव्हते. शेवटी या प्रकरणी उदानी यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. उदानी यांचा मृतदेह पनवेलजवळील जंगलात सापडल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. उदानी ज्या दिवशी बेपत्ता झाले त्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर सचिन पवारने १३ कॉल केले होते. या आधारे पोलिसांनी तपास करत सचिन पवारला अटक केली होती.

दरम्यान, सचिन पवार हा सध्या प्रकाश मेहतांसोबत कार्यरत नसला तरी घाटकोपर भाजपामध्ये तो सक्रीय असल्याचे सांगितले जाते. सचिन पवारच्या पत्नीलाही भाजपाने महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली होती.