व्याजाने दिलेले पैसे परत मागीतल्याच्या कारणावरुन चऱ्होलीतील त्या महिलेचा खून; दोघांना अटक

0
1208

भोसरी, दि. २० (पीसीबी) – व्याजाने दिलेले पैसे परत मागीतल्याच्या कारणावरुन दोघाजणांनी मिळून चऱ्होलीतील शेतात सुनंदा वाळके (वय ५८) या महिलेच्या डोक्यात दगड मारुण तसेच चाकूने वार करुन खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे.  ही घटना शनिवारी (दि. १६) चऱ्होली बुद्रुक येथील शेतात घडली होती.

या गुन्ह्याचा दिघी आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने समांतर तपास करत स्वप्नाली गिरीधारी चौधरी (वय ३४, रा. परांडेनगर, चिखली) आणि राधेश्याम रामनिवास कोरी (वय ४०, रा. भगवाननगर, वडगाव रोड, आळंदी) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा यांच्या चिखली, परांडेनगर येथे मालकीच्या काही खोल्या आहेत. त्या खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या आहेत. त्यातल्याच एका खोलीत आरोपी स्वप्नाली मागील तीन वर्षांपासून राहते. तिचे पती सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. स्वप्नाली दामदुपटीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेत असे. त्यातच तिने सुनंदा यांच्याकडून काही रक्कम वर्षभरात दुप्पट देण्याच्या अटीवर घेतली. पैसे घेऊन वर्ष उलटले तरी पैसे परत मिळत नसल्याने सुनंदा यांनी स्वप्नालीकडे पैशांसाठी वारंवार तगादा लावला होता.

पैशांच्या वारंवारच्या तगाद्याला कंटाळून स्वप्नालीने सुनंदा यांना मारण्याचा कट रचला. तिने रिक्षाचालक राधेश्याम याच्या मदतीने गुरुवारी (दि. १४) एकजण पैसे घेऊन येणार असल्याचे सांगून सुनंदा यांना चिखली, मोशी, देहूरोड, तळेगाव, चाकणरोड या भागात फिरवले. मात्र, त्या दिवशी तिला सुनंदा यांना मारता आले नाही. तिने शनिवारी पुन्हा राधेश्यामच्या सोबतीने सुनंदा यांना रिक्षातून चऱ्होली येथील एका शेतात नेले. तेथे त्यांनी सुनंदा यांच्या डोक्यात दगड घालून आणि चाकूने वार करून खून केला.  आरोपी स्वप्नाली आणि राधेशाम या दोघांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र राठोड, पोलीस कर्मचारी दीपक खरात, राजेंद्र शेटे, प्रमोद लांडे, प्रमोद वेताळ, सचिन उगले, अमित गायकवाड, महेंद्र तातळे, सावन राठोड, गणेश सावंत, प्रवीण पाटील, प्रमोद हिरळकर, सुनील चौधरी, गणेश मालुसरे, तानाजी पानसरे, अरुण गर्जे यांच्या पथकाने केला.