Pune

व्याजाने घेतलेले पैसे दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही; अशी धमकी देत एकाला मारहाण

By PCB Author

December 15, 2020

हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) – ‘व्याजाने घेतलेले पैसे दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत एकाला मारहाण केली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. १२) रात्री अकरा वाजताच्या सुमारास बावधन बुद्रुक येथे घडली.

ईश्वर एकनाथ दगडे, सुरज हरिचंद्र पडवळ, मयूर प्रकाश वेडे (सर्व रा. बावधन, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विश्वास कैलास दगडे (वय ३१, रा. बकाजी कॉर्नर, बावधन बुद्रुक, ता. मुळशी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींकडून पैसे घेतले आहेत. ते पैसे मागण्यासाठी शनिवारी रात्री आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. फिर्यादी यांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसून ‘व्याजाने घेतलेले २३ लाख रुपये दे. नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दरवाजावर लाथा मारून फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.