‘व्यवसायिक कबड्डी संघामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी’: नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे

0
225

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, पुणे यांनी शासनाच्या निर्णयानुसार व्यावसायिक कबड्डी संघ स्थापन केलेला आहे. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कबड्डी खेळ खेळण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करत आहे. त्यासाठी आज (दि.१२) रोजी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी व्यावसायिक कबड्डी संघ स्थापन करण्याला मंजुरी दिली.

यावेळी नगरसेवक शैलेश मोरे, नगरसेविका अश्विनी जाधव, नगरसेविका रेखा दर्शीले, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त क्रीडा सुषमा शिंदे, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे,जयश्री साळवे व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रा केंदळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराला कबड्डी या खेळाची वैभवशाली परंपरा असून अद्यापपर्यंत महानगरपालिकेच्या वतीने व्यवसायिक कबड्डी संघ स्थापन झालेले नाहीत. नवी मुंबई, ठाणे, पुणे या महानगरपालिकांनी शासन निर्णय २०१५ नुसार कबड्डी संघ दत्तक घेऊन व्यवसाय कबड्डी संघ तयार करण्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.कबड्डी खेळाची आपल्या शहराला उज्ज्वल परंपरा तसेच कबड्डी खेळाच्या विकासाला पूरक,पोषक वातावरण असतानाही आपल्या महानगरपालिकेचे क्षेत्रात कबड्डी खेळाचा एकही व्यावसायिक संघ निर्माण झालेला नाही.कबड्डी संघ व शहरातील उत्कृष्ट खेळाडू निवडून तयार करणे आवश्यक आहे. संघामुळे खेळण्याची व्याप्ती वाढून कबड्डीचा स्तर उंचावणार आहे.कबड्डीत गरीब घरातील विद्यार्थी असतात त्यांचा आर्थिक स्तर सुधारेल व कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात मिळेल. सकस आहार आदी गोष्टीची खेळाडूला स्वतःसाठी उपलब्ध करता येतील.

निवड चाचणीद्वारे खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूला चांगले मानधन देण्यात येणार आहे. वैद्यकीय सुविधा, प्रवास खर्च, क्रीडा साहित्य व गणवेश आदी बाबी खेळाडूंना पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना उच्च पातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे.

क्रीडा स्थापत्य विभाग,संगीत अकादमी निर्णय, शहरातील सर्व क्रीडा मिळकती व सुविधा यासाठी कॅमेरे बसविण्याचे काम प्रस्तावित,खेलरत्न पुरस्कार, कबड्डी संघ, अत्याधुनिक व्यायाम शाळा,जलतरण तलाव ,विविध खेळांची मैदाने,क्रिडा विद्युत, स्पर्धा परीक्षा केंद्र व सार्वजनिक वाचनालये क्रीडा विभागात समावेश करण्याचा निर्णय तसेच वरील अनेक विषयावर निर्णय घेण्यात आले आहेत.डिसेंबर महिन्यात हॉकी चॅम्पियनशिप चे आयोजन करण्यात आले आहे. याचा फायदा येणाऱ्या २०२९ च्या ऑलिंपिक स्पर्धेत होणार आहे.जागतिकीकरणाच्या युगात उद्योग क्षेत्रात क्रीडा क्षेत्राने भरारी घेतली आहे.महिला खेळाडूंना आज पुरुषांच्या बरोबरीने संधी उपलब्ध करून दिली जात असून महापालिकेच्या व सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे महिला खेळाडूंचा सहभाग अलिकडच्या काळात वाढतांना दिसून येते, असेही प्रा. केंदळे यांनी म्हटले आहे.