वॉचमनला जेवण किंवा मोलकरणीलाही धान्य दिले नसेल त्यांनी फुकटच्या सूचना करू नये – जितेंद्र आव्हाड

0
763

मुंबई,दि.१४(पीसीबी) – वॉचमनला जेवण किंवा मोलकरणीलाही धान्य दिले नसेल त्यांनी फुकटच्या सूचना करू नये, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

ज्यांनी आपल्या वॉचमनलाही जेवण दिलं नसेल किंवा या अडचणीच्या काळात आपल्या मोलकरणीलाही जेवण दिलं नसेल त्यांनी नको त्या फुकटच्या सूचना करू नये, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड क्वारंटाईन झाल्यावर अनेक वेगळ्या पद्धतीच्या चर्चांना उधाण आलं. त्यामुळे साऱ्या शंकांना उत्तर देण्यासाठी त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. जितेंद्र आव्हाड क्वारंटाईन गेले कारण त्यांच्या अमुक नोकरामुळे किंवा तमूक पोलिसामुळे त्यांना संसर्ग झाला असल्या कुचाळक्या करणाऱ्या, टवाळखोर बातम्या चघळणाऱ्या प्रसारमाध्यमांचा मला खरोखर संताप येतो. मुळात, कुणालाही असा दुर्धर आजार होणं ही काय गॉसिप करायची गोष्टी आहे? तुमच्यातल्या मानवी संवेदना पार संपल्या का? की पेपर खपवण्यासाठी यांनी त्या गहाण टाकल्या?, असं म्हणत आव्हाडांनी क्वारंटाईन गेल्यावर काहीही प्रश्न विचारणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, जर या चाचण्या झाल्या नसत्या तर हा आजार किती पसरला असता याची कल्पनाच न केलेली बरी. मी काही फार मोठा तीर मारला असा माझा दावा नाही. एक सामाजिक जाणीव म्हणून मी हे केलं. मंत्रिमंडळातील माझे सहकारी मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा ठाण्यातील तमाम पत्रकारांच्या चाचण्या करून घेतल्या. जे मी केलं ते उद्या धनंजय मुंडे साहेब सुद्धा करणार आहेत. कारण ही एक चांगलीच गोष्ट आहे. आपल्या माणसांची आपण काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

https://www.facebook.com/581568278627202/posts/2808537919263549/