Maharashtra

वैभव राऊत याच्या घरातून आणखी शस्त्रसाठा हस्तगत

By PCB Author

August 13, 2018

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – स्फोटके आणि बॉम्ब घरात बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता वैभव राऊत याच्या घरातून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आणखी शस्त्रसाठा आज (सोमवार) हस्तगत केला आहे. त्याचबरोबर त्याचा साथीदार सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून ६ हार्डडिस्क ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी एटीएस कसून चौकशी करत  आहे. एटीएसने वैभव राऊतच्या घरी टाकलेल्या  छाप्यात ८ पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि शस्रांचे अनेक सुटे भाग आढळून आले आहेत. तसेच दुसरा आरोपी सुधन्वा गोंधळेकर हा टेक्निकल एक्सपर्ट असल्याची माहिती समोर आली आहे. सुधन्वाच्या घरातून एटीएसने ६ हार्ड डिस्क, लॅपटॉप, ९ मोबाईल, अनेक सीमकार्ड जप्त केले आहेत. १ कार आणि मोटारसायकलही ताब्यात घेण्यात आली आहे.  याआधी एटीएसने सुधन्वाच्या घरातून शस्त्रसाठा जप्त केला होता.

सरहद संस्थेचे संजय नहार यांना काही महिन्यांपूर्वी पार्सलमधून बॉम्ब पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. हा पार्सल बॉ़म्ब कुरियर कंपनीच्या कार्यालयात फुटला होता. याप्रकरणात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर यांचा काही संबंध आहे का, याचीही चौकशी एटीएसकडून करण्यात येत आहे, असे सांगितले जात आहे.