वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश; मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

0
416

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मुंबईतील आझाद मैदानावर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी १५ दिवसांपासून  मराठा विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे.  पीजी मेडिकल प्रवेशाबाबत एसईबीसी आरक्षणाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. 

मराठा आरक्षणातील एका अटीमुळे काही विद्यार्थींना पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशापासून  मुकावे लागणार होते. या विद्यार्थ्यांसाठी सरकारने अध्यादेश काढला. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज ( सोमवारी)  अध्यादेशावर स्वाक्षरी केली.  या अध्यादेशामुळे २०१९-२० या वर्षासाठी शिक्षण संस्थांमध्ये पीजी आणि एमबीबीएस प्रवेशात मराठा आरक्षण लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला  आहे.

यावर्षी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू न करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हाच निर्णय कायम ठेवला होता. याविरोधात मराठा विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते.  यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने  अध्यादेश काढण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. अखेर या अध्यादेशावर राज्यपालांनी आज स्वाक्षरी केली.