Maharashtra

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न करू – अजित पवार

By PCB Author

May 13, 2019

मुंबई,  दि. १३ (पीसीबी) – वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत सरकारला आम्ही मदत करत आहोत. लवकरात लवकर कसा तोडगा निघेल,  यादृष्टीने प्रयत्न करत आहोत. जर अध्यादेश काढून प्रश्न सुटत असेल, तर त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. याबाबत आचारसंहितेचे कारण पुढे आले आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज चर्चा करुन लवकर हा तिढा सुटेल यासाठी प्रयत्न करू,  असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  म्हटले आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहिलेले मराठा विद्यार्थी मागील सात दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. या विद्यार्थ्यांची अजित पवार यांनी आज (सोमवार) भेट घेतली . त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतली.  त्यानंतर पवार बोलत होते.

कुणाच्याही तोंडाचा घास नसून, हे विद्यार्थी त्यांच्या हक्काची गोष्ट मागत असल्याने राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दर्शवला आहे, असे  अजित पवार यांनी यावेळी सांगितले. मात्र आंदोलनाचे राजकारण नको तर प्रवेशासाठी तोडगा काढावा,  असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.