वैद्यकीय दाखल्यांचे दुकान ? कोरोना लक्षणे तपासणीसाठी ९०० रुपये, गरिबांची लूट

0
606

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – गावी जायचे असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र सक्तीचे आहे आणि ते मिळविण्यासाठी तब्बल ९०० ते १००० रुपये शुल्क मोजावे लागतात. पिंपरी चिंचवड शहरातील काही डॉक्टरांनीच हा गोरख धंदा उघडला आहे. रोज हजारो सर्टिफिकेट दिली जातात. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांकडूनही त्याचे व्हेरिफिकेशन होत नाही. काही भागात डॉक्टरांच्या नावावर काही राजकीय कार्यकर्त्यांनीच हे दुकान उघडले आहे. बालाजीनगर येथील अशाच एका राजकीय कार्यालयात सुरू असेलेल्या धंदेवाईक डॅक्टरांचा नगरसेविका सीमा सावळे यांनी पडदाफाश केला. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबाबत तक्रार केली असता त्यांनी तत्काळ टाळे ठोकले.

पिंपरी चिंचवड शहरात बाहेरगावी जाणाऱ्यांसाठी तंदुरुस्तीचा दाखला सक्तीचा आहे. अशा प्रकारचे दाखले वरवर तपासणी करून दिले जातात. त्यात अत्यंत निष्काळजीपणा आहे. कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत परंतु प्रत्यक्षात कोरोना आहे असे रुग्ण निसटतात. तेच लोक पुढे सायलेंट कॅरीअर ठरत आहेत. असे दाखले राजरोसपणे दिले जातात, असे लक्षात आले. सर्दी, ताप, थंडी, खोकला म्हणजेच कोरोनाची लक्षणे असे समजून ज्यांना लक्षणे दिसत नाहीत त्यांना दाखला मिळतो. त्यानंतरच पोलिसांकडून परवनगी मिळते. शहरातून सुमारे साडेतीन लाख लोकांनी अशा प्रकारे आपल्या गावी जाण्यासाठी अर्ज केले आहेत. ज्या डॅक्टरांचे दवाखाने बंद होते तेसुध्दा आता सुरू झाले आहेत.

बालाजीनगर येथे एका राजकीय पक्षाच्या कार्यालयातून असे दाखले देण्याचा उद्योग सुरू होता. ज्या डॅक्टरांचा सही, शिक्का दाखल्यावर होता ते तिथे उपस्थित नव्हते. नगरसेविका सीमा सावळे यांच्याकडे त्याबाबत तक्रार येताच त्यांनी तिथे जाऊन माहिती घेतली. ज्यांच्या नावाने दाखला मिळतो ते डॅक्टर लोणीकंदला होते आणि तिसरीच व्यक्ती पैसे घेऊन दाखले देत होती. कुठल्याही प्रकारची तपासणी होत नव्हती. हा गंभीर प्रकार असून लोकांच्या आरोग्याशी खेळताय हे बरोबर नाही असे म्हणत सावळे यांनी थेट पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केला. जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रामती भावसार यांनी येऊन पाहणी केली. किती लोकांनी अशा प्रकारे दाखले दिले याची नोंद वगैरे काहीच नसल्याचे लक्षात येताच त्यांनी कारवाई केली. संबंधीत रोजचे ५० दाखले या प्रमाणे गेले आठवडाभर हे सुरू असल्याचे स्पष्ठ झाले. दाखले वाटप जिथे सरू होते त्या गाळ्याला टाळे ठोकण्यात आले.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी त्या प्रकरणात तत्काळ नोटीस बजावून कारवाईचे आदेश दिले. महापालिकेच्या जेष्ठ आरोग्य वैद्यकीय अधिकारी श्रीमती भावसार यांना विचारणा केली असता, सबंधीतांवर रितसर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तपासणीत दाखवे वाटप कुठलेही रेकॅर्ड नाही, असे स्पष्ठ झाले.
दरम्यान, शहरातील अशा प्रकारे तपासणी न करताच वैद्यकीय दाखले दिले जात असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सीमा सावळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणे बंद करा अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा त्यांनी दिला आहे.