वेटर, दरबान म्हणून मावळ्यांच्या वेशभूषेतील कामगारांची नेमणूक करु नका; ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांची मागणी

0
1281

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – हॉटेल्स, मंगल कार्यालय, विविध समारंभाच्या वेळी शिवकालीन वेशभूषेतील मावळ्यांना वेटर, दरबान म्हणून केली जाणारी नेमणुक अयोग्य आहे. यामुळे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची विटंबना होत असून हा प्रकार तातडीने थांबवावा अशी जोरदार मागणी जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा स्थायी समितीच्या माजी सभापती नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे.

ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे या विविध हॉटेल मालक, मंगल कार्यालयप्रमुख यांना समक्ष भेटून ही मागणी करीत आहेत. आपल्या पत्रकात सीमा सावळे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात सध्या लग्न सोहळ्यात वेटर, दरबान म्हणून मावळ्यांच्या वेशभूषेतील कामगार उभे केले जात आहे. विविध ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपन्या मावळ्यांच्या वेशभूषेतील तरुणांना दैनंदिन रोजावर कामावर घेतात. शिवकालीन वेशभूषा, हातात भाला घेतलेले हे मावळे पाहुण्यांना मुजरा घालण्याबरोबरच पडेल ती कामे याच वेशभूषेत करतात. हा सर्वप्रकार संतापजनक आहे.

सध्या बहुतांशी हॉटेल बाहेर दरबान म्हणून सुद्धा मावळ्यांच्या वेशभूषेतील कामगारांना नेमले जाते ज्या मावळ्यांनी छत्रपती शिवरायांना जिवाला जीव दिला. रयतेचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी जिवाचे रान केले. अश्या
मावळ्यांचे वेश परिधान केलेले वेटर, दरबान म्हणून काम करताना पाहुन वेदना होतात. यापुढील काळात लग्न सोहळे, हॉटेलमध्ये मावळ्यांची विटंबना होऊनये याची खबरदारी सर्वांनी बाळगावी. मावळ्यांचा अवमान होईल असे कोणतेही कृत्य घडू नये.

छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील मावळ्यांची अवहेलना कदापी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही नगरसेविका सीमा सावळे यांनी दिला आहे.