Pimpri

वेंगसरकर ॲकॅडमीचा उद्देश सफल; ऋतुराज आज आयपीएलमध्ये चमकला, उद्या देशासाठीही खेळेल – श्रीरंग बारणे

By PCB Author

November 07, 2020

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – महापालिकेत थेरगावचे प्रतिनिधित्व करत असताना शहरातून देशासाठी खेळणारे खेळाडू घडावेत, हा उद्देश ठेवून दिलीप वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी उभी केली. या ॲकॅडमीत सराव करून खेळाडू तयार होत आहेत. ॲकॅडमीचा उद्देश सफल होत असून ॲकॅडमी उभारून चांगले काम आपल्या हातून झाले याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असे सांगत ऋतुराज गायकवाड आज आयपीएलमध्ये चमकला, उद्या देशासाठीही खेळेल, असा विश्वास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

आयपीएलच्या १३ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणारा आणि दिलीप वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीत सराव केलेल्या ऋतुराज गायकवाड या नवोदित खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेट ॲकॅडमी उभी राहिली त्या शिवसेना खासदार बारणे यांनी आज (शनिवारी) ऋतुराजच्या सांगावीतील घरी जावून त्याचा सत्कार करुन त्याचे कौतुक केले. पिंपरी-चिंचवडचे नाव आणखी उज्जवल करण्यासाठी त्याला शुभेच्छाही दिल्या. यावेळी विश्वजीत बारणे, विजय साने, राजू कोतवाल, सिकंदर पोंगडे, चेतन शिंदे, राहुल पोंगडे आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, दिलीप वेंगसरकर ॲकॅडमीतील खेळाडू एक दिवस तरी भारतासाठी खेळेल असा विश्वास मी उद्घाटनावेळी व्यक्त केला होता. तो आज सार्थ झाला आहे. ऋतुराज आज आयपीएलमध्ये खेळला. उद्या देशासाठीही तो खेळेल. भारताच्या टीममध्ये खेळण्यासाठीचे कौशल्य त्याच्याकडे आहे. आता ऋतुराज भारताच्या ‘ए’ टीममध्ये खेळतो.

ज्या उद्देशाने थेरगावात आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट ॲकॅडमी उभी केली. तो उद्देश सफल होत आहे. चांगले खेळाडू तयार होत आहेत. ऋतुराजसह आणखी दोन खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. ऋतुराज लहान असल्यापासून मी त्याचा खेळ पाहत होतो. तो चांगला खेळाडू आहे. भविष्यात देशासाठी चांगले खेळून देशाचे, पिंपरी-चिंचवडशहराचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

भारताचे नेतृत्व करणारे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना आपण थेरगावात आणले. नगरसेवक असताना महापालिकेच्या माध्यमातून ॲकॅडमीला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. एक चांगले काम आपल्या हातून झाले याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या क्रिकेट ॲकॅडमीचे उद्घाटन मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या हस्ते झाले होते, असेही त्यांनी सांगितले. ऋतुराज आणि त्याच्या आई-वडिलांनी मानले खासदार बारणे यांचे आभार !

सत्कारावेळी त्याचे आई-वडील भावनाविवश झाले. तुम्ही क्रिकेट ॲकॅडमी उभी केली नसती. सुविधा पुरविल्या नसत्या, तर आज आमचा मुलगा आयपीएलमध्ये खेळू शकला नसता. पण, तुम्ही थेरगावात ॲकॅडमी उभी केल्याने त्याला सराव करायला मिळाला. त्यामुळेच आज तो आयपीएलमध्ये खेळत आहे. भविष्यात तो देशाच्या टीममध्ये देखील खेळेल, अशा भावना ऋतुराजच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या. तुम्ही ॲकॅडमी केल्यामुळेच तो खेळू शकला. आम्ही सर्वसाधारण कुटुंबातील असून परिस्थितीमुळे त्याला बाहेर कुठे सरावाला पाठवू शकलो नसतो. पण, तुमच्यामुळे तो शहरातच सराव करून आज क्रिकेट खेळत असल्याचे सांगत त्यांनी खासदार बारणे यांचे आभार मानले. यावेळी ऋतुराज याने देखील आभार व्यक्त केले.