Maharashtra

वृक्ष लागवड हा महाराष्ट्र सरकारचा दिखावा -सयाजी शिंदे

By PCB Author

August 18, 2019

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीवरुन संताप व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्रामध्ये होत असलेली वृक्ष लागवड हे केवळ एक नाटक आहे’, असे सयाजी शिंदे म्हणाले आहेत. इतकेच नाही तर महाराष्ट्रामध्ये ५ कोटी वृक्ष लागवडीची जी मोहिम आहे तीच मुळात थोतांड असून हे करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे कुरण आहे, असेही ते म्हणाले.

”राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला असून यामध्ये ३३ कोटी वृक्ष लावण्याचे लक्ष्य सरकारचे आहे. तसा निर्धारदेखील राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मात्र राज्य सरकारची ही वृक्ष लागवड योजना केवळ दाखविण्यापुरती आहे”, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणत सयाजी शिंदे यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

पुढे ते म्हणतात, “आपल्याकडे जवळपास २५० जातीची झाडे उपलब्ध असून अनेक शाळांच्या अंगणामध्ये मोठ-मोठी वृक्ष पाहायला मिळतात. मात्र दरवर्षी त्याच खड्ड्यांमध्ये जाऊन झाडे लावली जातात. इतकेच नाही तर ३३ कोटींचा टप्पा पार करण्यासाठी सरकार कोणतेही झाडे जाऊन लावत आहेत. माझ्याकडे २३ ठिकाणी १२ जिल्ह्यांमध्ये वृक्ष लागवडीचे काम सुरु आहे. मात्र मी कधीही त्याचे शुटींग केले नाही. किंवा ते सगळ्यांना दाखवलेही नाही. मी जी झाडे लावतोय त्यांची संख्या येत्या काळात आणखी वाढेल. झाडे लावतांना कोणत्या ठिकाणी कोणते झाड लावावे यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ मंडळी आहेत”.