Maharashtra

वीर सावरकरांना भारतरत्न मिळावा अशी आमचीही मागणी आहे – अजित पवार

By PCB Author

February 26, 2020

मुंबई,दि.२६(पीसीबी) – राज्य सरकारकडून अपेक्षा करता मग तुम्ही सत्तेत असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?” असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला केला आहे. वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमत्त आज सावरकरांचा विषय विधानसभेमध्ये चर्चेला आला. यावेळी वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा विषय सुरु असताना विरोधी पक्षाच्यावतीने विधानसभेमध्ये गोंधळ घालण्यात येत होता.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा पत्र लिहून वीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी केली होती. परंतु यामध्ये नेमकी काय अडचण आली याचं उत्तर मिळालं पाहिजे, अशी विचारणा अजित पवार यांनी विधानसभेमध्ये बोलताना केली. तसेच “वीर सावरकरांना भारतरत्न मिळावा अशी आमचीही मागणी आहे,” असंही पवार सभागृहात बोलताना म्हणाले.

“आपल्या सभागृहाचं कामकाज प्रथेनुसार चालतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृतीदिन आजच आला आहे असं नाही. यापुर्वीही त्यांचा स्मृतीदिन येवून गेला आहे. त्यामुळे मी वीर सावरकरांना आदरांजली वाहतो. त्यांच्या कामाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु सुधीर मुनगंटीवार व इतर नेत्यांना नेमकं काय राजकारण करायचं आहे की कोणता स्वार्थ साधायचा आहे हेच कळत नाही,” असं अजितदादा यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, सावरकरांना भारतरत्न मिळावा अशी आमचीही मागणी असल्याचे पवारांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं.