Sports

विहारी ठरतोय संकटमोचक

By PCB Author

May 14, 2021

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा शरीरवेधी मारा सहन करून भारताचा पराभव वाचवताना जी जिगर हनुमा विहारी दाखवली त्याहीपेक्षा कितीतरी पटीने त्याने देशातील कोविडग्रस्तांची मदत करताना दाखवली. आपल्या मित्रवर्गाच्या माध्यमातून त्याने कोविड संकटकाळात रुग्णांना रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध होईल याची काळजी घेतली. भारताचा पराभव वाचवण्याचे समाधान आहेच, पण हे समाधान कितीतरी पटीने मोठे आहे असे तो मानतो. मैदानाप्रमाणे ते मैदानाबाहेरही संकटमोचक म्हणून आपली प्रतिमा जपून आहे.

देशात कोविड १९ची दुसरी लाट थैमान घालत असताना सोशल मिडीयाने तातडीने मदत उपलब्ध करुन देण्यात महत्वाचा वाटा उचलला. अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी सामाजिक बांधिलकी जपत या प्रसंगात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. पण, कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये असूनही विहारीने आपल्या ट्विटर हॅंडलचा अचूक वापर करून मदतीसाठी आवाहन केले. त्याने या माध्यमातून १०० स्वयंसेवकांचे जाळेही तयार केले. विहारीच्या या मित्रांनी आंध्र प्रदेश, तेलंगणार आणि कर्नाटकात रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यापासून ऑक्सिजन मिळतो की नाही याची काळजी घेण्याचे काम केले. त्याबरोबरीने हे मित्र प्लाझ्मा दान करण्याच्या आवाहानासाठी नागरिकांपर्यंत पोचले.

मला स्वतःचा गौरव करून घ्यायचा नाहीये. तळागाळातील लोकांना या संकटकाळात मदत व्हावी या एकाच उद्दिष्टाने मी हे काम केले. अत्यंत कठिण काळात सर्वांनी एकत्र येऊन काम करावे आणि मदत उपलब्ध व्हावी हेच या मागचे उद्दिष्ट होते. -हनुमा विहारी

देशातील कोविड संक्रमणाची लाट भयावह होती. देशात रुग्णांना बेड मिळणेही कठिण झाले होते. हे सगळे विचारकरण्यापलिकडचे होते. त्यामुळे मी माझ्या फॉलोअर्सची मदत घेतली. त्यांना स्वयंसेवक बनवत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला, असे विहारीने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. या माध्यमातून आम्ही ज्यांना सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. अर्थात, हा खारीचा वाटा होता. मला भविष्यात अशा व्यक्तींसाठी आणखी भरीव काम करायचे आहे, असे ही त्याने सांगितले.

मी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. माझा आंध्रमधील संघ सहकारी पृथ्वीराज यारा याने सर्वप्रथम साथ दिली आणि त्यानंतर शंभर एक जण एकत्र आले. आता विविध आघाड्यांवर ही संख्या वाढत आहे आणि याचा फायदा घेऊन मला अधिक लोकापर्यंत आणि लोकांसाठी पोचायचे आहे. ही काळाची गरज आहे, असे त्याने सांगितले.