विषारी दारुने घेतले तब्बल ११ बळी; ‘मृतदेह ट्रॅक्टरमधून घेऊन जाणार’ नातेवाईकांची भूमिका

0
320

भोपाळ, दि. १२ (पीसीबी) – विषारी दारु पिल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात घडली आहे. सात जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मोरेनाचे पोलीस अधीक्षक अनुराग सुजानिया यांनी दिली.

मोनेर जिल्ह्यातील दोन गावांमध्ये या घटना घडल्या आहेत. पहावली आणि मनिपूर अशी या गावांची नाव असून, पहावलीतील तीन, तर मनिपूरमध्ये सात लोक मरण पावले आहेत. सात जण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने तिला ग्वालियरला हलवण्यात आलं आहे.

विषबाधा झालेली दारू देशी बनावटीची असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दारू प्राशन केलेल्या लोकांना मध्यरात्री उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. यातील दहा जणांचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचं रुग्णालयात दाखल करताना समोर आलं. तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मोरेना जिल्हा रुग्णालयात मयताच्या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी मयताच्या कुटुंबीयांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गोंधळ घातला. रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन जाण्याचा आग्रह रुग्णालय प्रशासनाकडून नातेवाईकांना करण्यात आला. मात्र, ट्रॅक्टरमधूनच मृतदेह घेऊन जाऊ, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली. त्यावरून गोंधळ झाला.

अशा घटना घडल्यानंतर कारवाई करण्यात येते. मात्र, या दारूची विक्री थांबवण्यासाठी का प्रयत्न केले जात नाहीत. पोलिसांसह यात अधिकारी सहभागी असल्याचा आरोप कुटुंबीयांच्या नातेवाईकांकडून यावेळी करण्यात आला. हे नातेवाईक मंगळवारी सकाळी रुग्णालयात पोहोचले होते. देशी दारू गावात सहज उपलब्ध होते आणि त्यावर पोलीस कारवाई करत नाही, असं नातेवाईकांनी म्हटलं आहे.