विश्व हिंदू परिषदेच्या ‘या’ बड्या नेत्याला बनावट रेमडेसिविरची विक्री केल्याबद्दल अटक

0
459

नवी दिल्ली, दि.११ (पीसीबी) : देशात कोरोनाच सावट असताना एकीकडे रेमडेसिवीर चा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. लोकांना बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी धावपळ करावी लागतेय. मात्र यादरम्यान अनेक राज्यांमध्ये रुग्णांच्या खिशाला कात्री लावत औषधांचा काळाबाजार सुरु असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मध्य प्रदेशातही सुरु असलेलं बनावट रेमडेसिविरचा काळाबाजार पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून यामध्ये चौघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याचाही समावेश आहे.

पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेचे नर्मदा विभागाचे प्रमुख सरबजीत सिंह मोखा यांना बेड्या ठोकल्या आहेत. सरबजीत हे जबलपूरच्या सिटी रुग्णालयाचेही प्रमुख आहेत. इंदूर येथून ५०० रेमडेसिविर इंजेक्शन मिळवत रुग्णालयामधील करोना रुग्णांना दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सरबजीत यांचे मॅनेजर देवेंद्र चौरसीया, सपन जैन यांचा समावेश आहे. औषध कंपन्यांसोबत डिलरशीपची जबाबदारी यांच्यावर होती.
बनावट रेमडेसिविरची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केल्यानंतर गुजरात पोलिसांनी ही घटना उघडकीस आली. ७ मे रोजी सपन जैन यांना जबलपूर येथून अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतर विश्व हिंदू परिषदेने सबरजीत यांना पदावरुन काढून टाकलं असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी असं म्हटलं आहे.

या प्रकरणी जबलपूरचे पोलीस महानिरीक्षक भगवत सिंग यांनी “रेमडेसिविर तसंच ऑक्सिजनचा काळाबाजार रोखण्यासाठी आम्ही नुकतंच अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावरील अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. आम्ही काळाबाजार रोखण्यासाठी त्यांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती दिली आहे