Desh

विश्वचषक क्रिकेट युद्धासाठी भारतीय संघ शस्त्रसज्ज- रवी शास्त्री

By PCB Author

May 15, 2019

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – विश्वचषक क्रिकेट युद्धासाठी भारतीय संघ शस्त्रसज्ज असल्याचा इशारा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिला आहे. भारतीय संघ हा लवचीक असून, वातावरणानुसार संघबांधणी करण्यात येईल, असे शास्त्री यांनी सांगितले.

विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली. त्यावेळी तमिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उत्तम पर्याय असल्याचे म्हटले जात होते. परंतु या स्थानावर फलंदाजीसाठी कोणताही खेळाडू निश्चित झाला नसल्याचे शास्त्री यांनी सांगितले. ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ३० मे ते १४ जुलै या कालावधीत इंग्लंडमध्ये होणार आहे.

‘प्रसंगानुरूप व्यूहरचना आखण्यासाठी पुरेशी शस्त्रसज्जता आमच्याकडे आहे. आमचा संघ अतिशय लवचीक आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी काही खेळाडूसुद्धा आमच्याकडे आहेत. त्यामुळेच मी त्याची अजिबात चिंता बाळगत नाही,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

‘फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आमची रणनीती तयार आहे. यानुसार खेळू शकणारा १५ खेळाडूंचा संघसुद्धा सज्ज आहे. कोणत्याही वेगवान गोलंदाजाला दुखापत झाल्यास बदली खेळाडूसुद्धा उपलब्ध आहे,’’ असे शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिले.