विश्वचषकामध्ये हॅटट्रिक करणारा मोहम्मद शमी दुसरा भारतीय गोलंदाज

0
499

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – विश्वचषकामधील अत्यंत अटीतटीच्या  झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ११ धावांनी निसटता विजय मिळवला. या सामन्यांत  मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यांपुढे अफगाणिस्तानच्या तळाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. डावातील शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी १६ धावांची गरज होती. शमीने शेवटच्या तीन फलंदाजांना  बाद करत हॅट्ट्रिक केली.  शमी विश्वचषकामध्ये हॅटट्रिक करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

क्रिकेट विश्वचषकामध्ये हॅटट्रिक नोंदवणारा शमी हा  दहावा आणि भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी चेतन शर्मा यांनी १९८७ च्या विश्वचषकात हॅटट्रिक  केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून याआधी चेतन शर्मा, कपिल देव आणि कुलदीप यादव यांची हॅटट्रिक झाली आहे.

दरम्यान, साऊदम्पटनच्या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने अफगाणिस्तानसमोर २२५ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र, कमी धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजापुढे चांगले झुंजावे लागले.  मोहम्मद नबी, गुलबदीन नैब, रेहमत शहा यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला विजयापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या १०  षटकात केलेल्या  टिचून माऱ्यापुढे अफगाण फलंदाजांना तग धरता आला नाही.