Desh

विश्वचषकात महेंद्रसिंह धोनी भारताचा हुकुमी एक्का- झहीर अब्बास

By PCB Author

May 22, 2019

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू झहीर अब्बास यांनी महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा हुकुमी एक्का ठरेल असे अब्बास म्हणाले. ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होते आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.

“भारतीय संघात महेंद्रसिंह धोनी नावाचा एक हुशार खेळाडू आहे. एका अर्थाने भारतीय संघ त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्याकडे विश्वचषकात भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे, याचसोबत तो सामन्यात बदलणारी परिस्थिती लगेच ओळखतो. त्याचा अनुभव हा संघासाठी फायदेशीर ठरणार आहे. भारतीय संघासाठी धोनी हा हुकुमाचा एक्का ठरेल.”

यावेळी अब्बास यांनी विराट कोहलीचेही कौतुक केले. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिला विश्वचषक असणार आहे, त्यामुळे आपले नेतृत्व सिद्ध करुन दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असेल, असे अब्बास म्हणाले. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.