विश्रांतवाडीत धारदार शस्त्राने वार करुन रिक्षाचालकाचा खून

0
789

विश्रांतवाडी, दि. ७ (पीसीबी) – धारदार शस्त्राने वार करुन एका रिक्षाचालकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (रविवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास विश्रांतवाडी येथील शेलार घाट परिसरातून उघडकीस आली.

अनिल धोत्रे (वय ३७) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विश्रांतवाडीतील नदीच्या किनारी असलेल्या शेलार घाट परिसरात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. सकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्याचे नाव अनिल धोत्रे असल्याचे समोर आले. शनिवारी तो एका मित्रासोबत दारू प्यायला बसला होता. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास धोत्रे आणि त्याचा मित्र आपापल्या घरी जाण्यास निघाले. मात्र धोत्रे घरी पोहोचलाच नाही. वाटेतच त्याचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील तपास करत आहेत.